वयाच्या 19व्या वर्षी 'सत्यकथे'तून 'वृक्ष' ही पहिली कविता प्रसिद्ध झाली. त्यानंतर चार दशके झाली ते वैशिष्ट्यपूर्ण अशा कविता लिहीत आहेत. मात्र या कविचा अजून संग्रह प्रकाशित झालेला नाही. शरद नरेश यांच्या कविता ‘शरद नरेश’ म्हणूनच वाचाव्या लागतात. आणि त्या कविता वाचतानाही खास प्रकारे वाचाव्या लागतात. त्या कविता मांडणी, आशय, शब्द, शब्द समुच्चय, अर्थ, अर्थ समुच्चय, ध्वनी, ध्वनी समुुच्चय अशा स्वतंत्र किंवा एकत्रित विशेषांसह आविष्कृत होतात. अशा या कविचा परिचय करून देण्यासाठी हा ब्लॉग. यात शरद नरेश यांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये दर्शविणार्या कविता कविशी चर्चा करून निवडून घेतल्या आहेत. शिवाय दोन मान्यवरांनी त्यांच्या कवितांच्या पाहणीनंतर काढलेले निष्कर्ष ब्लॉगच्या तळाला सापडतील. शेवटची ब्लाॅग नोंद कविचा लेख आहे. कविचे चिंतन समजून घेण्याच्यादृष्टीने तो महत्त्वाचा वाटला. ब्लॉगवर दिसणारी चित्रे हेही शरद नरेश यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू. या चित्रांचा आणि काव्याचा थेट संबंध नाही. तो जाणवल्यास निव्वळ योगायोग समजावा.शरद नरेश यांनी कथाही लिहिलेल्या आहेत याचीही नोंद घ्यावी. हा ब्लॉग मात्र केवळ कवितांपुरता मर्यादित आहे. (- समीर झांट्ये , ब्लाॅगकर्ता)
No comments:
Post a Comment