वयाच्या 19व्या वर्षी 'सत्यकथे'तून 'वृक्ष' ही पहिली कविता प्रसिद्ध झाली. त्यानंतर चार दशके झाली ते वैशिष्ट्यपूर्ण अशा कविता लिहीत आहेत. मात्र या कविचा अजून संग्रह प्रकाशित झालेला नाही. शरद नरेश यांच्या कविता ‘शरद नरेश’ म्हणूनच वाचाव्या लागतात. आणि त्या कविता वाचतानाही खास प्रकारे वाचाव्या लागतात. त्या कविता मांडणी, आशय, शब्द, शब्द समुच्चय, अर्थ, अर्थ समुच्चय, ध्वनी, ध्वनी समुुच्चय अशा स्वतंत्र किंवा एकत्रित विशेषांसह आविष्कृत होतात. अशा या कविचा परिचय करून देण्यासाठी हा ब्लॉग. यात शरद नरेश यांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये दर्शविणार्‍या कविता कविशी चर्चा करून निवडून घेतल्या आहेत. शिवाय दोन मान्यवरांनी त्यांच्या कवितांच्या पाहणीनंतर काढलेले निष्कर्ष ब्लॉगच्या तळाला सापडतील. शेवटची ब्लाॅग नोंद कविचा लेख आहे. कविचे चिंतन समजून घेण्याच्यादृष्टीने तो महत्त्वाचा वाटला. ब्लॉगवर दिसणारी चित्रे हेही शरद नरेश यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू. या चित्रांचा आणि काव्याचा थेट संबंध नाही. तो जाणवल्यास निव्वळ योगायोग समजावा.शरद नरेश यांनी कथाही लिहिलेल्या आहेत याचीही नोंद घ्यावी. हा ब्लॉग मात्र केवळ कवितांपुरता मर्यादित आहे. (- समीर झांट्ये , ब्लाॅगकर्ता)

न थकणारी कथा, ऐकत ऐकत



...च्या कथा ऐेकून
दिशादिशांना फुटलेले रस्ते, संशयाचे

स्वत:चे अश्रू त्याने
तिच्याच पदराला पुसले होते का ?
अश्रू. स्वत:चे म्हणण्यासाठी
दु:ख तरी त्याचेच होते का ?
त्याला दु:ख होण्यासाठी
धुक्यात विझलेली गूढ आकृती
तिचीच होती का ?

...च्या कथा ऐकताना
तो पळाला, ते घाबरून की तिला शोधण्यासाठी ?
तिचा शोध घेताना, झालेली, कुजबुज की पळापळ ?
कुजबुज वावटळीतून, उडाला, तो धुराळा की हवाला ?








            ...च्या कथा ऐकल्यानंतर
            वार्‍यावर उडालेला पदर
            ही वार्‍याची करामत की करामतीचं वारं ?
            त्याच्या हातांनी राखून ठेवलेला
            तिच्या वक्ष:स्थलांचा स्पर्श
            सार्वजनिक होतोयची, काळीकुळकुळीत भीती
            त्याच्या मनात... तिच्या मनात…
            तिच्या मनात, हललेला, स्पर्श सुखाचा डोलारा
           खरा की खोटा ?

           तो म्हणजे देहभान
           ती म्हणजे देहवती










त्याच्या बेभान देहाचं उसळतं कारंजं
सौंदर्याचं सालंकृत साकडं अर्पण करणारी
ती साक्षात देहमती
जणू पिंगा घालणार्‍या स्वप्नांची देहस्वी दरवळ
भानविरहित शृंगारधनाच्या शिखरावर, अल्पकाळ
तरंगत्या मेघांचे सरमिसळ तरंग
अचानक तिच्या नग्नकल्लोळ देहाचा आक्रोश
आक्रोश - पवित्र आणाभाकांना सुद्धा गर्भ रहावा तसा
त्यानंतर उडालेली उभी आडवी तारांबळ
म्हणजे दोघांमध्ये भडकलेली धांदल
की अखेरची धुसफूस ?
आ वासून हात पसरलेला... क्षण, पराभवाचा की चेष्टेचा
सार्वजनिक बोलबालांचा चौफेर गराडा
अर्थात
एकमेकांच्या अंदाजात
पुन्हा एकदा
तिचा देहभान आणि त्याची देहवती








       त्याची ती नि तिचा तो ?
       उगवतीच्या मनात उगवतीला
       फुलांचा गोडवा अन पाखरांची किलबिल
       चित्रातल्या एकाच फांदीवर
       पाखरांचा किलबिलाट विसावताना
       चित्रातल्या त्याच फांदीवर
       अंधारून येणारा हलकासा अंधार
       दिवस मावळतीला मावळतीच्या ओघात.







दिवस मावळताना मावळतीच्या रंगात
अंधारातले खेळ, रंगतानासुद्धा लटपटतात
अर्थात
        ...च्या कथांचे झाकोळून उधळलेले उधाण
अर्थात
        ...च्या कथांचे सैरभैर पसरलेले संदर्भ
अर्थात
        ...च्या कथांचे वादळात विस्कटलेले रंगगंध
अर्थात
       अंधार उजेडातल्या पाठशिवणीच्या रहस्यात
        शिळलेल्या नजरांची चकमक









                नि मिटलेल्या ओठांचा अबोला
                कि अस्वस्थ ओठांची ओढ ?
                आणि नजरांची नजरबंदी ?
                समोरासमोर अंधार छटांच्या जाळ्यात
आंधळ्या हालचालींना उब
अन पदराला दिलेली डूब
वार्‍यावरच्या उबेला, ओलांडताना अडखडलेल्या
चाली चालतात
आडवळणांनी घेतलेली चाहूल
अर्थात
       ...च्या देखत,
          किरकोळ गर्दीच्या डोळ्यांदेखत
          उफाड्याच्या धसमुसळ्या इंद्रियांवर
          फिदा होण्याच्या धास्तीला गर्दीचा नकार
          अशा अधाशीपणाला न जुमानण्याचा हव्यास गर्दीला
अर्थात
         ...च्या ऐकीव घटना ऐकताना, त्याच्या चेहर्‍यावर
         बिनचेहर्‍या पावलांनी, हरवलेला प्रवास दिशादिशांना
अर्थात
      ...च्या ऐकीव घटना ऐकल्यानंतरची, तिची घालमेल
          धमन्यांमधून कोरत राहते, ह्रदयांची धडधड, दिशादिशांना
          असा धडकी भरलेला घटनांचा घंटानाद
          आणि कडेलोटाच्या वळणावर पेरलेले सुरूंग



......च्या पासून निघालेला सुगावा, कुणापर्यंत ?
......च्यार्पंत पोहोचलेला दुवा, कुठपर्यंत ?
.....च्या जुळणार्‍या फसगतीची चढाओढ, कशासाठी ?


....च्या पाठीवरच्या रक्ताचे डाग, एका दिशेला
 त्यांच्या आत्महत्येची अफवा, दुसर्‍या दिशेला
....च्या कथांच्या कथांच्या कथा
ऐकल्यानंतर
ऐकणार्‍यांना ऐकलेल्या कथा


न थकणार्‍या कथा ऐकत ऐकत

No comments:

Post a Comment