वयाच्या 19व्या वर्षी 'सत्यकथे'तून 'वृक्ष' ही पहिली कविता प्रसिद्ध झाली. त्यानंतर चार दशके झाली ते वैशिष्ट्यपूर्ण अशा कविता लिहीत आहेत. मात्र या कविचा अजून संग्रह प्रकाशित झालेला नाही. शरद नरेश यांच्या कविता ‘शरद नरेश’ म्हणूनच वाचाव्या लागतात. आणि त्या कविता वाचतानाही खास प्रकारे वाचाव्या लागतात. त्या कविता मांडणी, आशय, शब्द, शब्द समुच्चय, अर्थ, अर्थ समुच्चय, ध्वनी, ध्वनी समुुच्चय अशा स्वतंत्र किंवा एकत्रित विशेषांसह आविष्कृत होतात. अशा या कविचा परिचय करून देण्यासाठी हा ब्लॉग. यात शरद नरेश यांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये दर्शविणार्‍या कविता कविशी चर्चा करून निवडून घेतल्या आहेत. शिवाय दोन मान्यवरांनी त्यांच्या कवितांच्या पाहणीनंतर काढलेले निष्कर्ष ब्लॉगच्या तळाला सापडतील. शेवटची ब्लाॅग नोंद कविचा लेख आहे. कविचे चिंतन समजून घेण्याच्यादृष्टीने तो महत्त्वाचा वाटला. ब्लॉगवर दिसणारी चित्रे हेही शरद नरेश यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू. या चित्रांचा आणि काव्याचा थेट संबंध नाही. तो जाणवल्यास निव्वळ योगायोग समजावा.शरद नरेश यांनी कथाही लिहिलेल्या आहेत याचीही नोंद घ्यावी. हा ब्लॉग मात्र केवळ कवितांपुरता मर्यादित आहे. (- समीर झांट्ये , ब्लाॅगकर्ता)

स्त्री : एक शैली



तिच्या चेहर्‍यावर
चंद्र
उगवताना
स्त्री रूप
एक
सौंदर्य शैली

चांदणे फुलांचे । उडते फुलपाखरू
पाखरे फुलांची । रेशमी पंचमी
केशरी पारिजात । पारिजात ओठी
ओघवती देहवती । लवलवती रूपमती

रूप झंकार । देह साकार । भव्य प्रतिमा

तिची भव्यता : भव्यतेचे चुंबन
चवदार चुंबन : चविष्ट वेदना
उत्तेजित कारंज : मात्र सहवेदना
कृतार्थ कौमार्य : कौमार्य अहंकार
फुटलेला अंकुर : रात्रगंध रज:स्वला
योगस्थ योनी
शैलीदार शिल्प
शिल्प संस्कार : संपन्न शील
शील सन्मान : सर्वोच्च मान
नारी देह
नारी नखरा
नारी--न--खरा--न--तो--तोरा
न--खर्‍यात---नच---तोर्‍यात
नारी संदेह
नाही संदेह
नारी देह । नख शिखान्त । नंदनवन
नितांत
निवांत
नग्न विहार
नग्न चित्कार
आनंद अंगार : सुलभ शृंगार
लक्ष गवाक्ष
लखलखती
अक्ष-लक्ष-लोचने
लवलवती
लयदार देहाची  ललकारी
ललामभूत
अंगभूत
प्रगल्भ : प्रतिमा

सौष्ठव : साकार
तिच्या चेहर्‍यावर
सूर्य
उगवताना
स्त्रीरूप
एक
संपन्न शैली

कोमल किरण : तंग तोल
तुळतुळीत । तिचा चेहरा । छाया छटा
मिसळताना
कोरी कामुकता : कोरीव कमनीयता
नितंब नृत्य : नृत्य निष्णात
निष्णात उरोज : उरोज उर्मी
उरोज ऊर्जा । उष्ण। ऊर्जितावस्था
आर्जवी देहगंध : देहस्वी दरवळ
अवघा परिसर : परिघ अवसर
आतुर आवाहन : अधीर अष्टांग
सर्वांग
स्त्री : पुरुष
बिंबाप्रति बिंब
साक्षात समोर
पुरुष सूक्त । तिष्ठत ठेवलेला । ताठरपणा
आसक्त युक्त : अवघे विषयांतर
कामासक्त : पुरुष : अपूर्ण पूर्णांक
उच्चांक
बुलंद
पूर्णानंद : ........ देह
अंतरिक्षाच्या                  अंतरंगात
पवित्र आकाश                    उतरते क्षितिज
घुमटकार घुमते                  अनवाणी आकाशवाणी

प्रारंभीच
आर्त आकाशवाणी
प्रारंभीच
आर्त आकाशवाणी
स्त्री
एक
नक्षत्र शैली

No comments:

Post a Comment