‘कविता : लय आणि लावण्य’ या लेखाच्या सुरुवातीलाच मला हे विशद करायला पाहिजे की, आत्तापर्यंत लिहिल्या गेलेल्या कवितेतील ‘लय आणि लावण्य’ शोधण्याचा किंवा दाखवून देण्याचा माझा हेतू नाही. किंबहुना आजच्या कवितेतील ‘लय आणि लावण्य’ यांचा अभाव किंवा कमतरता दाखविणे, त्याची कारणे शोधणे हाच माझा मुख्य हेतू आहे. आजच्या कवितेत कोणत्या प्रकारच्या लावण्याचा अभाव आहे, आणि त्यावरचा उपाय काय अशा दोन्ही गोष्टीचा सविस्तर विचार मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. हा लेख वाचत असताना कदाचित मी अकारणच विषयांतर करत आहे असे वाचकांना वाटेलही. पण अत्यंत मूलभूत मुद्दे आणि त्यांचे सर्वांगीण आकलन, यांच्या स्पष्टिकरणार्थ जे जे आवश्यक आहे त्याचा विचार करायलाच हवा. लेख संपूणॅ वाचून झाल्यावर मी हा खुलासा सुरुवातीलाच का केला याचाही बोध वाचकांना होईल. (या लेखासाठी मी मुद्दामच परिभाषा टाळून साध्या सोप्या भाषेत लिहीत आहे.)
कलेचे जीवनात नेमके स्थान काय इथूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. कारण संपूर्ण कलेचा आपल्या संपूर्ण जीवनाशी संबंध असतो. परंतु जीवन हे प्रथम असून कलेचा प्रश्न मगच उपस्थित होतो. कारण जीवनातून कलेचा उगम होतो. जीवन नसते तर कलेचा प्रश्नच आला नसता. म्हणजे कला हा जीवनाचा ‘एक भाग’ आहे. कारण जीवन म्हणजे एकच अखंड, प्रचंड असा कलात्मक क्षण कधीच होऊ शकणार नाही. तर जीवनाच्या अखंड प्रवासातील काही रम्य, अद्भूत क्षण म्हणजेच कला होय. आपण आपले जीवन जितक्या समरसतेने, जाणीवपूर्वक, संवेदनक्षमतेने, गांभीर्याने जगू तितकी आपली कलासुद्धा जिवंत स्वरूप घेईल. तसेच जीवन जितक्या उथळपणे घेतले जाईल तितका कलेच्या आविष्कारावर विपरित परिणाम होईल. सारांश, संपूणॅ जीवनाचा संपूर्ण कलेशी निकटचा संबंध असून त्यासाठी अनुभव समृद्ध असायला हवेत. त्याचा क्रम पुढीलप्रमाणे लावता येईल.
कलाकृतीची लय किंवा लावण्य याचा प्रत्यक्ष अनुभवाशी संबंध आहे. म्हणजेच कवितेची लय ही अनुभवाच्या लयीतून प्राप्त झाली पाहिजे. हाच या लेखाचा गाभा आहे.
इथे लय हा structural प्रकार आहे आणि लय किंवा लयीच्या विविध प्रकारातून तयार होणार संपूर्ण आकार म्हणजे लावण्य होय. लावण्य हे केवळ कमनीय किंवा मादकच असले पाहिजे असे नव्हे. तर जे सौष्ठवपूर्ण, घाटदार आणि स्वत:चा वैशिष्ठ्यपूर्ण स्वतंत्र आकार व्यक्त करणारे असते ते लावण्य होय. (लावण्य हे Total form, size & shape शी संबंधीत असते.)
इथे लय हा structural प्रकार आहे आणि लय किंवा लयीच्या विविध प्रकारातून तयार होणार संपूर्ण आकार म्हणजे लावण्य होय. लावण्य हे केवळ कमनीय किंवा मादकच असले पाहिजे असे नव्हे. तर जे सौष्ठवपूर्ण, घाटदार आणि स्वत:चा वैशिष्ठ्यपूर्ण स्वतंत्र आकार व्यक्त करणारे असते ते लावण्य होय. (लावण्य हे Total form, size & shape शी संबंधीत असते.)
स्फटिकिकरण (Crystalization) हे जसे सहज आणि नैसर्गिक पद्धतीने होते तद्वतच अनुभवाचे स्फटिकिकरण होऊन त्याचे पैलू कलेतून अविष्कृत व्हायला हवेत.
अनुभवाचा समृद्धपणा आणि अनुभवाची लय यांचा आग्रह पुढील दोन गोष्टींच्यासाठी आवश्यक ठरावा.
1) त्यात आपल्या (गुंतागुंतीच्या) अस्सल जीवनाचे तसेच वेगवेगळ्या काळाचे प्रतिबिंब आणि प्रतिनिधीत्व उमटताना दिसेल.
2) अनुभवाची लय जर कलाकृतीतून व्यक्त झाली तर त्याठिकाणी अनुभव घेणार्याच्या वैयक्तिक (क्षुद्र) आवडी-निवडीचे सावट कलेेवर रहाणार नाही, तसेच तंत्राचा बडेजाव न येता आवश्यकतेनुसारच तंत्राचा वापर होईल. आणि मग कलेच्या आविष्कारात कलाकार हा केवळ निमित्तमात्र उरेल. म्हणजेच अनुभवाच्या लयीचा विकास होत ती कलेतून व्यक्त होईल. अशा प्रकारचा अविष्कार केवळ ‘सहज’ कृतीतच शक्य आहे. कुठल्याही फॅड किंवा पोझच्या वेडापायी शक्य नाही. पण यासाठी प्रथम अनुभवाचा आवाका, आकार, लय हे व्यवस्थित समजायला हवे.
आता आपण अनुभव आणि अनुभवाची लय, त्यानंतर कविता व कवितेची लय म्हणजे काय ते पाहू.
अनुभव : माझ्या अस्तित्वाचा सभोवतालच्या परिस्थितीशी झालेला संवाद म्हणजे अनुभव होय. मग ‘माझे अस्तित्व’ आणि पर्यायाने ‘मी’ म्हणजे काय ? केवळ देह म्हणजे की नव्हे. पुढील आलेख पहा.
म्हणजेच माझे अस्तित्व हे मानसिक आणि शारिरीक संवेदनांच्या संयुक्त मिलाफात असते. माझ्या या अस्तित्वाचे सभोवतालच्या परिस्थितीशी जे मानसिक, शारिरीक नाते निर्माण झालेले असते त्या सर्वांचा मिळून ‘मी’ होतो. म्हणजेच आपले अस्तित्व हे संपूर्ण वातावरणासहीतच असते. ते वातावरण सोडून स्वत:बद्दलचा विचार करणे हा ‘मी’ बद्दलचा प्रचंड भ्रम आहे. सांगायचा हेतून हा की, मी म्हणजेच संबंधीत वातावरण - संपूर्ण अवस्था. ही अवस्था अर्थातच विकेंद्रीत असते. त्यामुळेच मी जरी फक्त देहापुरताच मर्यादित दिसत असलो तरी त्या विकेंद्रित गोष्टीसुद्धा माझ्या अस्तित्वाच्या निदर्शकच असतात. तेव्हा ते माझे अप्रत्यक्ष विक्रेंद्रित अस्तित्वही तितकेच महत्वाचे असते. आणि वातावरणातील परिस्थितीतील अस्थिर, चंचलतेमुळे आपल्या या अप्रत्यक्ष विकेंद्रित अस्तित्वाला एक प्रकारच्या चढउतारामुळे लय प्राप्त झालेली असते. ही लय समजणे अत्यंत महत्वाचे आहे.
आता आपण सध्याच्या कवितेतील लयीचा विचार करूया.
पद्य हे गद्यापेक्षा लवचिक असल्याकारणाने काव्यानूकुल आहे. त्यामुळे पद्यातून नाजूक अशी कलाकुसर करणे सोपे आणि सोईचे असते. प्रथम अखंड अशा काळाला खंड देऊन त्याचा एक तुकडा पाडला जातो. अशा तुकड्यांच्या (निश्चित कालावधीच्या) पुनरावृत्तीतून ठेका आणि ताल निर्माण होतो. (त्यामुळे लवचिकपणाला थोडासा कणखरपणाही येतो.) म्हणजेच विशिष्ठ ठिकाणी गती नियंत्रित करून पुन्हा जोर दिला जातो. त्यामुळे आंदोलनाचा आभास निर्माण होतो. या आंदोलनाच्या विशिष्ठ गतिचक्राला सफाईदारपणामुळे लयबद्धपणा तर येतोच पण सुखद अशी आल्हाददायकताही प्राप्त होते. जुन्या काव्यामधून अशा प्रकारच्या ताल आणि ठेक्यावरच जास्त भर असे. त्यामुळेच वृत्तांना महत्व आले होते. परंतु वृत्तातील अति काटेकोर
नियमितपणामुळे त्याला कृत्रिमताही प्राप्त झाली. या कृत्रिमतेला झुगारून देणार्या तालबद्ध अक्षररचनेच्या छंदातून, प्रत्येक ओळीला स्वतंत्र आकार देणार्या मुक्त छंदाला उधाण आले. कारण मुक्तछंदात गरजेनुसार पण अनियमित तरीपण सुसंबद्ध अशा ठेक्यासाठी प्रत्येक ओळीची लांबी रूंदी ठरते. तसेच ही लांबीरूंदी प्रत्येक ओळीच्या अर्थ**** संतुलित केल्या कारणाने फापटपसार्याला आपोआपच आळा बसतो.
हल्लीच्या मुक्तछंदातून बहुतांशी बौद्धिक कल्पना तरंग किंवा रेखीव चित्रांकनाचा प्रत्यय येतो. आजच्या कवितेचे हे प्रमुख लक्षण असले तरीपण कविता तिथेच कित्येक दिवस रेंगाळू लागल्याने तिच्यातील प्रगतीचा प्रवाह स्थिर होत असल्याचे जाणवते. म्हणजेच आजच्या काव्यातील जिवंतपणा नष्ट होत असल्याचे प्रत्ययाला येते. डॉक्टर जसे रोगाचे निदान करतात त्याप्रमाणे मी हे कवितेचे निदान करत आहे. पण आजचे काव्य हे मृत होत आहे हे समजण्यासाठी, पटण्यासाठी, भाबडी आणि हळवी दृष्टी सोडली पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर रोग निदान करण्यासाठी मुळात दृष्टिच निरोगी असायला हवी.
आजची कविता ही मुक्तछंदाच्या लयबद्धतेपर्यंत येऊन थांबलीय. तो सोपा, सुटसुटीत आणि आकर्षक छंद आहे हे मान्य. पण शेवटी कोणताही छंद हा तंत्राचाच प्रकार असल्याकारणाने तो कुठल्याही अभिव्यक्तीसाठी राबविणे हे चुकीचे तर आहेच पण घातकही आहे म्हणजेच मुक्तछंदाच्या पुढच्या तंत्र विकासाची आवश्यकता आहे. कारण आजचे अनुभव हे निश्चितच जटील आणि गुंतागुंतीचे आहेत (पण आम्हाला ते तसे जाणवतच नाहीत कारण अनुभव घेण्याची चुकीची पद्धत.) अनुभव जितके तरल, सूक्ष्म, गुंतागुंतीचे तितके ते व्यक्त करणे अवघड, त्यासाठी तितकेच जबरदस्त सामर्थ्याचे माध्यमही हवे आणि माध्यमाची ताकदही त्यातील शास्त्रीय आणि तांत्रिक गोष्टींच्या अत्याधुनिक सुसज्जतेवर अवलंबून असते. शास्त्र आणि तंत्र हे जितके अत्याधुनिक आणि निर्दोष तितका अविष्कारही प्रसन्न आणि संपन्न होतो. इथे अभिव्यक्तीक्षमतेचे महत्व लक्षात यावे. ज्याप्रमाणे सुरुवातीला चित्रपण ‘मूक’ होता, पुढे तो ‘बोल’पट झाला. नंतर बोलपटही रंगीत झाला आणि कलात्मकतेचा, वास्तवाचा हुबेहूब प्रत्यय आणून द्यायचा चमत्कार घडवला.
थोडक्यात सांगायचे तर उत्कृष्ठ अविष्कारासाठी तंत्र आणि शास्त्रही उत्कृष्ठच हवे. कविता ही उत्कृष्ठ ‘शब्दकळा’ आहे. पण तिच्या माध्यमाचा कसून फायदा घेतला जात नाही. विविध रचनाबंध आणि आकृतिबंधातून ते शक्य आहे.
आजपर्यंत कविता रूढ अशाच छंद वृत्तातूनच मांडण्याचा आग्रह दिसून येतो त्यामुळे कविता ही अनुभवाशी निगडीत वाटत नाही तर रूढ अशा लयींच्या प्रकारात कविता ‘वसविल्या’ सारखी वाटते. कोणताही अनुभव हा रूढ (बाह्य) स्वरूपातून व्यक्त करणे म्हणजे अनुभवापेक्षा मुखवण्यालाच प्राधान्य दिल्यासारखे आहे. आणि मुक्तछंदाच्या तांत्रिक मर्यादा लक्षात न घेताच त्यावर लुब्ध होणे म्हणजे तर अंधश्रद्धेलाच शरण जाण्यासारखे आहे.
परंतु जेव्हा अनुभवाची अस्सल लयच कवितेतून व्यक्त होऊ लागेल तेव्हां तिच्या बाह्य लयीचा विचार करण्याची गरज भासणार नाही. कारण बाह्य - दर्शनी लय ही अंतर्लयीतून आपोआपच जोपासली जाते. त्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची जरूरी नसते. पण आज तरी याचा कोणी विचार करताना दिसत नाही.
असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे आजच्या कविता, अनुभव घेण्यामागचा तोकडा आणि चुकीचा दृष्टीकोन, पण यात जर सुधारणा झाली तर रसरशीत अशा अनुभूतीची लय तितक्याच आकर्षकपणे कवितेत उमटल्यावाचून राहणार नाही. कारण अनुभव हेच मुळी कलाकृतीचे बीज आहे. आणि अनुभव म्हणजे प्रत्यक्ष अवस्था - म्हणजे प्रत्यक्ष वातावरण. आणि वातावरणासंहीत अनुभवाचा प्रत्यय आणून देणे हे कलाकृतीचे सर्वश्रेष्ठ कार्य होय. पण यासाठी अनुभूतीच्या लयीतूनच कलाकृतीचा विकास व्हायला पाहिजे. कारण अशी लय कलाकृतीतून फक्त आवश्यक तेवढ्याच घटकांसहीत प्रतिसृष्टीचा एक प्रगल्भ आणि उत्कट असा प्रत्यय आणून देते. हा प्रत्यय सुंदर, मोहक, आकर्षक, भयावह, भयानक, क्रूर किंवा हिंस्त्रही असेल. पण तो जीवनाचाच एक पैलू असेल. ते एक प्रखर असे जीवनमूल्य असेल. म्हणजेच कदाचित (निखळ) सत्य असेल.
एकाच अनुभवाला विविध बाजू किंवा लयी असतात, म्हणजे काय ते पाहू.
- आपण अनुभव घेताना वरीलपैकी प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र किंवा संयुक्त अनुभव घेतो. म्हणजे असे की,
- मी समूद्र किनार्यावर उभा आहे.
लाटा, क्षितिज, आभाळ, ढघ बघतो आहे - दृश्य संवेदना - आकाशाचा, ढगांचा रंग सुंदर वाटतोय - रंग संवेदनात्याच वेळी लाटांचा आवाज ऐकतोय - श्रवण संवेदना
- समजा बागेत उभा असेन तर फुलांचा वास
मला मोहवून टाकतोय - गंध संवेदना - वारा माझ्या अंगाला झोंबतोय, केस विस्कटून
टाकतोय - स्पर्श संवेदना
(याशिवाय चव ही सुद्धा संवेदना आहे. ती दुसर्या कुठल्या प्रसंगात जाणवेल.)
आता फक्त एकच संवेदना जाणवत असेल तर तिचा आलेख काढणे सोपे आहे. परंतु कोणत्याही प्रसंगात आपण अनेक संवेदनांनी एकत्रित अनुभव घेत असतो. त्यामुळे प्रत्येक संवेदनेची स्वतंत्र लय क्षणाक्षणाला बदलत आपल्या मनात भिन्न भिन्न भावना निर्माण करत असते. अशा संयुक्त अनुभवात त्यातील एकेरीपणा जाऊन एक नवाच पिळदार, भक्कम किंवा नाजूक सुंदरपणासहीत वेगळाच स्वंतंत्र (आकार) रचनाबद्ध (composition) निर्माण करते. यासाठी संवेदना ज्या तरल पातळीवर उद्भवते तिथल्या निखळ, निकोपपणापासूनच ती समजायला हवी. आणि नंतर मग वेगवेगळ्या संवेदनांचे एकमेकांशी जे नाते निर्माण होत जाते ते ध्यानात यायला हवे. (इथे अज्ञान किंवा आवड-निवड यामुळे विपरित परिणाम घडू शकतात.) म्हणजेच आपण सर्व संवेदनांच्या बाबतीत जागृत आणि अत्यंत प्रामाणिक असायला हवे. त्यासाठी चौफेर दृष्टी आणि चौकसपणाची गरज आहे. त्यामुळे तुलनात्मक आणि संतुलनाच्यादृष्टीने अनुभवाला अधिक तरलपणा येतो. थोडक्यात सर्व संवेदनांच्या बाबतीत उत्सुक आणि जागृत पाहिजे अन्यथा गायकाला चित्रकला समजत नाही, चित्रकाराला कविता समजत नाही आणि कवीला वरील गोष्टी समजत नाहीत असे दिसून येते. याचा अर्थ प्रत्येक कलाकार हा अगदी अष्टपैलू कलाकार असायला पाहिजे असे नव्हे, तर तो इतर सर्व संवेदनांच्या पातळीवरही जागृत असायला हवा. अभिव्यक्तीसाठी कारागिरी कौशल्याची गरज असते. एखाद्याजवळ एखादेच अभिव्यक्तीकौशल्य असेल पण तो जर सर्व संवेदनांच्या पातळीवर जागृत असेल तर त्याचे एकमेव अभिव्यक्तीकौशल्य अधिक जोमदार होईल. मी अभिव्यक्ती कौशल्यापेक्षा त्या अगोदरची जी संवेदना पातळी आहे तिच्यावर जास्त भर देतोय हे सर्वांच्या लक्षात येईल. ज्यांच्यापाशी कसलीच कारागिरी नाही पण संवेदनपातळ्या जागृत आहेत, तो उत्तम रसिक होऊ शकेल.
आपण एकेरी संवेदना लयीचा आलेख वर पाहिलाच आहे. आता संयुक्त लयीतून कोणता रचनाबंध तयार होतो त्यासंबंधी पुढील रेखाटणांवरून कल्पना येऊ शकेल.
यातील प्रमाणबद्ध घटकांमधून निर्माण झालेला संपूर्ण आकार हे लावण्य होय. असले हे रचनाबंध व्यक्तीपरत्वें, प्रसंगपरत्वे भिन्न असतील. रचनाबंधासंबंधी व्याख्या किंवा Formula तयार करता येणार नाही, हे सांगायची गरज नाही. प्रत्येकाने स्वत:च्या अनुभवाप्रमाणे स्वत:चा स्वतंत्र अविष्कार करावा.
यातील प्रमाणबद्ध घटकांमधून निर्माण झालेला संपूर्ण आकार हे लावण्य होय. असले हे रचनाबंध व्यक्तीपरत्वें, प्रसंगपरत्वे भिन्न असतील. रचनाबंधासंबंधी व्याख्या किंवा Formula तयार करता येणार नाही, हे सांगायची गरज नाही. प्रत्येकाने स्वत:च्या अनुभवाप्रमाणे स्वत:चा स्वतंत्र अविष्कार करावा.
यापुढील प्रश्न म्हणजे कविता आणि काव्य म्हणजे काय ?
- शरद नरेश
(म.र.वा. (मराठी रसिक वाचक) काव्यांक - 1978 )
हा लेख कविने वयाच्या 25व्या वर्षी लिहिला होता व वयाच्या 28 व्या वर्षी
छापून आला होता, अशी माहिती कविकडून प्राप्त झाली. या लेखाची प्रतही कवीकडून प्राप्त झाली.
(म.र.वा. (मराठी रसिक वाचक) काव्यांक - 1978 )
हा लेख कविने वयाच्या 25व्या वर्षी लिहिला होता व वयाच्या 28 व्या वर्षी
छापून आला होता, अशी माहिती कविकडून प्राप्त झाली. या लेखाची प्रतही कवीकडून प्राप्त झाली.
No comments:
Post a Comment